गोर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
जालना : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य या उपोषणात सहभागी झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी दिली. यावेळी ॲड. रवी राठोड, सुधाकर जाधव, श्याम आडे, संदीप जाधव, घनश्याम आडे आदींची उपस्थिती होती.
लोटाबहाद्दरांवर कारवाईची मागणी
मंठा : तालुक्यातील पेवा येथील अनेक नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. शासकीय योजनेतून गावात ३५९ शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, अनेकजण त्याचा वापर करीत नाहीत. त्यामुळे उघड्यावर जाणाऱ्या लोटाबहाद्दरांची संख्या वाढली आहे. लोटाबहद्दरांवर कारवाई करावी, अशी मागणी अंबादास लाखुळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शिष्यवृत्तीसाठी आधार लिंकचे आवाहन
जालना : समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करावेत, असे आवाहन सहायक समाज कल्याण आयुक्तांनी केले आहे. निर्धारित वेळेत आधार क्रमांक लिंक न केल्यास विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित शाळा, महाविद्यालयावर राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.