याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील औरंगाबाद मार्गावरील काली मशिदीची २७ एकर इनामी जमीन ही ८८ लोकांना किरकोळ भाडेकरार करून दिली आहे. ज्याची किमत कोट्यवधी रुपये होते. तसेच जे भाडे ठरले आहे, तेदेखील वक्फ बोर्डाकडून वसूल केले जात नाही. तसेच जालन्यातीलच जामा मशिदीची जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जवळपास ३०० एकरपेक्षा अधिक शेतजमीन आहे. काही जमीन ही परस्पर विक्री केली तर काही ठिकाणी चुकीचे भाडेपट्टे केले असल्याचे अन्सारी यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासह औरंगाबाद मार्गावरील शेरसवार दर्गाची जमीनही अशाच प्रकारे चुकीची हस्तांतरित केली असून, अंबड येथील बियाबाणी दर्गाची ४५० एकर शेतजमीनही वादात सापडली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या निवेदनात अन्सारी यांनी म्हटले आहे की, या सर्व प्रकरणांची चौकशी करून जे व्यवहार बेकायदा झाले असतील ते रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जामा मशिदीचे गुलाम मेहबूब यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अन्सारी यांनी केलेले आरोप फेटाळले असून, आम्ही सर्व ती कायदेशीर लढाई लढत असून, यातून दहा ते बारा प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने झालेले व्यवहार रद्द ठरविले आहेत. उर्वरित प्रकरणांमध्येही न्यायालयीन लढा सुरू असल्याचे मेहबूब यांनी सांगितले.