तळणी (जि.जालना) : अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणारा मुरुमाचा ट्रॅक्टर, जेसीबी अडवून विचारणा करणाऱ्या नायब तहसीलदारांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास दहिफळ खंदारे शिवारात घडली.
नायब तहसीलदार संजय शिंदे व त्यांचे सहकारी रविवारी रात्री अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी गस्तीवर होते. त्यावेळी तळणीकडे येताना दहिफळ खंदारे (ता.मंठा) फाट्याजवळ मुरुमाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसला. त्यांनी चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने मुरूम टाकून पळ काढला. ट्रॅक्टरचा पाठलाग करताना एक जेसीबी आढळून आला. जेसीबीचालकास तुमच्या जेसीबीने मुरूम भरून दिला का? अशी विचारणा शिंदे यांनी केली. त्यावेळी एका कारमधून आलेल्या संभाजी खंदारे याने इतरांसमवेत मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार नायब तहसीलदार शिंदे यांनी मंठा ठाण्यात दिली.
शिंदे यांच्या फिर्यादीवरून संशयित संभाजी खंदारे यांच्यासह ट्रॅक्टर व जेसीबीचालकांविरोधात कलम ३०३ (२), १३२, ११५(२), ३ (५) बीएनएससह कलम ३ व ४ गौण खनिज कायदा १९५२ सह कलम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७), (८) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउनि. माळगे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास पो.नि. रवींद्र निकाळजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बैठी, फिरती पथके असतानाही थांबेना वाळू चोरीतळणी सर्कलमधील पूर्णा नदीकाठच्या खोरवड, उस्वद, हनवतखेडा, कानडी, लिंबखेडा, दुधा, टाकळखोपा, किर्ला, वाघाळा, पोखरी केंधळे, भुवन व वझर सरकटे या गावांतून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंठा तहसीलदारांनी महसूल व पोलिसांची संयुक्त तीन बैठी पथके व नायब तहसीलदारांचे फिरत्या पथकाची स्थापना केली आहे. तरीही स्थानिक वाळूचोर महसूल व पोलिसांच्या पथकाला चकवा देऊन रात्रंदिवस वाळूचोरी करीत असल्याचा आरोप कानडीचे माजी सरपंच केशव खंदारे यांनी केला आहे.