राजेभाऊ भुतेकर
मंठा : थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीजबिल वसुलीसाठी शासकीय योजनेची माहिती देत हे कनेक्शन कट केले जात असून, महावितरणच्या कारवाईमुळे हाताशी आलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत.
थकीत वीजबिल वसूल व्हावे, यासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी कृषिधोरण राबवले जात आहे. या योजनेच्या जनजागृतीबरोबरच कृषी पंपांचे वीज कनेक्शनदेखील कापण्यात येत आहे. मंठा तालुक्यात सन २०२०च्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मूग, उडीद, मका, बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पाणी मुबलक असल्यामुळे रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मोठी मदार होती. परंतु शेतकऱ्यांकडे कृषिपंपांची जवळपास ८० कोटी रुपये थकबाकी असल्याने कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. त्यामुळे हाताशी आलेले रब्बीचे पीक वाया जाते की काय, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान, वसुलीसाठी महावितरणकडून कृषी धोरण २०२० राबवण्यात येत आहे. त्यात शेतकऱ्यांना ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. यासाठी
तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, या जनजागृतीदरम्यान शेतकऱ्यांनी अडीच लाख रुपये थकबाकी जमा केली आहे.
कोट
मंठा तालुक्यात ११७ गावातील १० हजार ग्राहकांकडे सुधारित पॉलिसीनुसार ८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कृषिधोरण २०२० नुसार शेतकऱ्यांना वीजबिलात ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यासाठी आपल्याकडील कृषिपंपांची थकबाकी भरून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
आर. एस. खंडागळे
उपकार्यकारी अभियंता, मंठा