जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन महिन्यात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ. ॲड. विलास खरात यांनी गुरुवारी केली आहे.
भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ॲड. विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ॲड. खरात यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यात सन २०१८ चा पीक विमा अजूनही वाटप झालेला नसून शासनाने याचीही गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे यावेळी त्यांनी नमूद केले. भाजपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन दिले त्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्यापही अनेक बँकांनी पूर्ण न केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना तात्काळ कर्जाचे वाटप करण्यात यावे, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांना नियमित वेळेत वाटप करण्यात यावेत, या व अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी रामेश्वर पा. भांदरगे, मुरलीधर चौधरी, शिवाजी बोबडे, सुरेश कदम, रामराजे खरात, पांडुरंग उगले, श्रीमंत शेळके, दादा अटकळ, शंकर लहामगे, बालाजी सोळंके, श्रीनिवास उढाण, प्रेमानंद उढाण, बाळासाहेब नाझरकर, अॅड. वैभव कटके, अशोक तारख, शिवाजी शेवाळे, डॉ. किशोर पाखरे, शिवहार कलाने, कांता काकडे, विठ्ठल नांदे, शिवाजी पवार, कृष्णा पवार, राम अटोळे, विलास अटोळे, सुधाकर म्हस्के, एकनाथ गायकवाड, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.