सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचे गावात जंगी स्वागत
तळणी : जास्तीत-जास्त तरूणांनी भरतीची तयारी करून, सैन्यात भरती व्हावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, असे आवाहन तळणी येथील नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक विष्णू मुदळकर यांनी केले.
मंठा तालुक्यातील तळणी येथील विष्णू मुदळकर हे भारतीय सैन्य दलात १९ वर्षे सेवापूर्ण करून सेवानिवृत्त झाले. सेवापूर्ती झाल्यानंतर ते आपल्या गावी परतले असता, ग्रामस्थांनी ढोल तासांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या बहुतांश तरूण व्यसनाच्या आहारी जात आहे. व्यसनामुळे तरूण आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करतात. तरूणांनी व्यसनाच्या आहारी न जात आपल्या ध्येयाकडे लक्ष देऊन यशस्वी व्हावे. आजकल बहुतांशजण आपल्या आई-वडिलांना वृध्द आश्रमात पाठवितो. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनाच आपण घराबाहेर काढतो. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करावा, असे सांगून जास्तीत-जास्त तरूणांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी, असे आवाहनही मुदळकर यांनी केले. यावेळी महिलांनी घरासमोर रांगोळी काढून त्यांचे स्वागत केले. विष्णू मुदळकर हे २००२ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. तब्बल १९ वर्ष सेवापूर्ण करून ते आपल्या गावी परतले आहे. यावेळी सैनिक डिंगाबर सरकटे, माजी सैनिक हरिदास रामचन्द्र सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.