जालना: जालना येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना इन्स्टाग्रामवर बनवलेल्या रिल्समधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. २४ एप्रिलपूर्वी झालेल्या या घटनेबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे कृत्य एका अल्पवयीन मुलाने केल्याची माहिती आहे.
सदर रिल्समध्ये आरोपीने बनावट आयडी वापरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली, तसेच त्यांना गोळ्या मारून जीवे मारण्याची धमकी दिली. "मिस यू किंग" असे वाक्य वापरून धमकी प्रसारित केली. अभिमन्यू खोतकर यांनी या प्रकरणी गुरुवारी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाच्या दरम्यान सायबर पोलिसांच्या मदतीने हे कृत्य एका १३ वर्षांच्या मुलाने केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याचे पालकांसमवेत त्याला समज दिली.
इन्स्टाग्रामवर धमक्यांचा सामना"अशा धमक्यांपासून आम्ही घाबरत नाही. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर धमक्यांचा सामना करत आहोत. आम्ही आमचे काम करणे सुरूच ठेवू आणि या प्रकारांवर योग्य प्रतिसाद देऊ," असे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले.- अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना शिंदे गट