पवन पवार, वडीगोद्री(जालना)- मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी अमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालवली. यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुखांची आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भावजय आल्या. यावेळी देशमुख कुटुंबाने जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख, हे उपोषणाच्या चौथ्या दिवशी सकाळी उपोषणात सहभागी झाले. दरम्यान, सलग चार दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खालावली असून, उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोरू धरू लागली आहे.
वैभवीच्या विनंतीनंतर एक ग्लास पाणी प्यायले
बहुमताचे सरकार आहे, समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यानंतर मयत संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली. यानंतर जरांगे पाटील वैभवी आणि संतोष देशमुकांच्या आईच्या हाताने एक ग्लास पाणी प्यायले. जरांगे पाटलांची खालवलेली प्रकृती बघून देशमुख कुटुंबांनाही अश्रू अनावर झाले.