- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : टेम्पो आणि खाजगी बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शेतमजुर मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
केजवरून शेती कामासाठी एका टेम्पोमधून काही मजूर भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे निघाले होते. शुक्रवारी मध्यरात्री जालना ते वडीगोद्री मार्गावरील सुखापुरी फाट्याजवळ जालन्याहून बीडकडे जाणाऱ्या एका खाजगी बसची मजूरांच्या टेम्पोसोबत समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील अंजना पुरुषोत्तम सापनर ( ३०) आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर ( १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली) या मायलेकीचा मृत्यू झाला. तर पुरुषोत्तम नाथराव सापनर ( ४०), कृष्णा पुरुषोत्तम सापनर ( १६), बाळू शेळके वय ३५, सतीश लव्हटे ( ३५ रा. तडेगाव ता. भोकरदन जि. जालना) हे किरकोळ जखमी आहे.
तसेच खाजगी बसमधील विजय नेहारकर ( रा. परळी), रामचंद्र फड ( कनेरवाडी) , संदीप उमाजी शेप व यश फुलारे ( शेपवाडी ) हे जखमी झाले आहेत. जखमींना अंबड उप जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर जालना येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. माय लेकीचा मृत्यू झाल्याने सापनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हिंगोली जिल्ह्यातील धानोरा गावावर मोठी शोककळा पसरली आहे.