बदनापूर : बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे एका पित्यानेच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाने मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी बाप हरी बाबूराव जोगदंड यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे यांना दावलवाडी येथे एका मुलीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ते टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यांना तिथे मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाल्याची शंका आली. पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान वडिलांनी तिचा खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह दोरीने लटकवून आत्महत्येचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालातून मुलीचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मुलीचे वडील हरी बाबूराव जोगदंड यानेच मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ आरोपी हरी बाबुराव जोगदंड याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास एपीआय स्नेहा करेवाड करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे, सपोनी स्नेहा करेवाड, सपोनी अविनाश राठोड, पोउपनि संतोष कुकलारे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.