देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी देऊळगावराजा शहराला भेट दिली. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी केलेल्या चर्चेत या पथकाने सकारात्मक भूमिका मांडल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
जैन व त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच श्री बालाजी महाराज यांच्या भरणाऱ्या यात्रेची माहिती घेतली. शिवाय कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांची मते जाणून घेतली. तालुक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीकडून या ठिकणी घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची माहिती घेण्यात आली. शिवाय खडकपूर्णा प्रकल्पामुळे या परिसरात बागायती क्षेत्रात वाढल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही हा रेल्वे मार्ग का आवश्यक आहे? हे उदाहरणांसह पटवून दिले. उपस्थित अनेक मान्यवरांनीही या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक भूमिका मांडत त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सुनीता शिंदे, डॉ. रामदास शिंदे, रमेश कायंदे, सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे पदाधिकारी, तहसीलदार सारिका भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जगदाळे, सचिव किशोर म्हस्के यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
सकारात्मक अहवाल देणार
देऊळगाव राजा येथील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जैन यांनी आपण सकारात्मक अहवाल रेल्वे विभागाला देणार असल्याचे सांगितले. तसेच देऊळगावराजा येथील नागरिकांमध्ये रेल्वे मार्गासाठी असलेला उत्साह हा वाखाणण्याजोगा असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री बालाजी महाराजांची नगरी असल्याने या ठिकाणाहून हा मार्ग गेल्यास आपल्याला आनंद होईल, असेही जैन यांनी यावेळी सांगितले.
शेकडो वर्षांपासून पाठपुरावा
इंग्रजांच्या काळात जालना ते खामगाव या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करून ठिकठिकाणी मार्किंग करण्यात आले. मात्र, उत्पन्नाच्या कारणावरून हे काम रखडले होते. त्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. २०१६ मध्ये भाजप शासनाने पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तीन हजार कोटी रुपयांना तत्त्वत: मान्यता दिली होती. यातील काही रक्कम राज्य शासन, तर काही रक्कम खाजगी विकासक देतील, असे ठरले होते; परंतु ही फाइल लालफितीत अडकली. या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे या समितीने सकारात्मक अहवाल दिला तर हा विकासाचा मार्गही मोकळा होणार आहे.