भोकरदन ( जालना) : भोकरदन तालुक्यातील सुरांगळी परिसराला आज दुपारी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यावेळी वीज कोसळून बाजीराव रामराव दांडगे (50) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
सुरांगळी परिसरात आज दुपारी 3 वाजेच्या जोरदार वारा सुटून पावसाला सुरुवात झाली. यावेळी गट क्रमांक 400 मधील शेतात बाजीराव दांडगे हे बाजरीचा चारा जमा करीत होते. त्याचवेळी विजेच्या कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. तेव्हा अचानक बाजीराव दांडगे यांच्या अंगावर वीज कोसळली. हे पाहून दांडगे यांची भाऊजई इंदूबाई दांडगे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारील शेतकरी धावून आले. त्यांनी बाजीराव दांडगे यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी दांडगे यांना मृत घोषित केले.