दिलीप सारडा
बदनापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, आता महावितरण, नगरपंचायत, महसूलकडून कराच्या वसुलीचा तगादा शहरवासीयांकडे लावला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
गतवर्षी मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे शहरातील अनेकांचे रोजगार बुडाले. अनेकांचे व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन अनेकांचे अर्थचक्र बिघडले होते. अनेकांना कोरोनाच्या धास्तीने आपल्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा ? असा प्रश्न पडला होता. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनला शिथिलता देण्यात आली. त्यामुळे उद्योगधंदे हळूहळू रूळावर येत असून, अनेकांचा रोजगार पुन्हा सुरू झाला आहे. कोरोनातून मोकळा श्वास घेणाऱ्या या नागरिकांना आता प्रशासकीय कराच्या वसुलीच्या तगाद्यामुळे चांगलेच त्रस्त व्हावे लागत आहे. नगरपंचायत कार्यालयाने शहरवासीयांना मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, शिक्षण कर, स्वच्छता कर, वृक्ष कर, दिवाबत्ती कर आदी विविध करांच्या थकबाकी व चालू बाकीची रक्कम भरण्यासाठी बिले देऊन तगादा लावला आहे. दुसरीकडे महसूल प्रशासनही अकृषक कराच्या वसुलीसाठी सरसावले असून, तहसील कार्यालयाच्या पथकाने शहरात कसूरदारास मागणी नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये गावठाणामधील एकूण १२८ खातेदारांना ५ लाख १२ हजार १७२ रूपयांच्या व सातबारावरील गावठाणाबाहेरील एकूण ८४ खातेदारांना ७ लाख ४० हजार ८७४ रूपयांच्या थकीत वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. तहसील कार्यालयाला यावर्षी अकृषक, रोहयो शैक्षणिक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सेस अशा विविध करांच्या वसुलीसाठी प्रपत्र अ चे एकूण ६८ लाख ५६ हजार रूपयांचे उद्दिष्ट असून, डिसेंबर अखेरपर्यंत ३५ लाख ४३ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
नगरपंचायत कार्यालयाची सन २०२०-२१ ची मालमत्ता व पाणी पट्टी कराची एकूण मागणी एक कोटी आठ लाख चाळीस हजार रुपये असून, त्यापैकी २० जानेवारीपर्यंत १२ लाख २३ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित मागणीसाठी शहरातील रहिवाशांना या कार्यालयाने बिले दिली आहेत. तसेच वीज वितरण कंपनीनेही कोरोनाच्या काळातील थकीत वीज बिल वसूल करण्याची मोहीम सुरू केली असून, वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे.
व्यापारी, नागरिकांच्या बैठकीत आमदार नारायण कुचे यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून कोरोनामुळे नागरिक, व्यापारी त्रस्त आहेत. त्यामुळे करवसुलीच्या नोटिसा रद्द करण्याचे सूचित केले होते. शिवाय शिष्टमंडळानेही उपविभागीय अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून कर वसुली थांबविण्याची मागणी केली होती. परंतु, सुरू असलेली कर वसुली पाहता ही मागणी धुडकावण्यात आल्याचे चित्र आहे.
कोट
टप्प्या- टप्प्याने कर भरण्याची मुभा
यावर्षी कर वसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही शहरात अकृषक कराच्या भरणाबाबत नोटिसा दिल्या आहेत. नगरपंचायत अकृषक कर वसूल करीत नाही. त्यांची वेगळी कर आकारणी आहे. कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. नोटीस दिल्यानंतर मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया करणार नाही व थकबाकीदारांना टप्प्याटप्प्याने हा कर भरण्याची मुभा दिली आहे.
-छाया पवार
तहसीलदार
कोट
करासाठी सक्ती नाही
गेल्या वर्षी मार्चअखेर कोरोनामुळे करवसुली झाली नाही. तसेच त्यानंतरही आतापर्यंत करवसुलीचे प्रमाण कमी झाले आहे. कर मागणी करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, यामध्ये थकबाकीदारांवर कोणतीही सक्ती केलेली नाही.
-भारत पवार
कर निर्धारण अधिकारी, नगरपंचायत
कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, व्यापारी, शेतकरी, नागरिकांची आर्थिक घडी कोलमडलेली आहे. यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना आता कर वसुलीचा तगादा सुरू आहे. कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती पाहता कर वसुली थांबवावी.
-राजेंद्र जैस्वाल
माजी नगरसेवक