त्यातच ज्यांच्याकडे पाणी होते, ते देखील पूर्ण क्षमतेने पिकांना पाणी देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे हे आभाळाकडे लागून होते. मंगळवारनंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला होता. मंगळवारी मध्यरात्री सर्वत्र धुवाधार पाऊस झाला. विशेषकरून परतूर तालुक्यात सर्वांत जास्त पावसाने हजेरी लावली. यासह अंबड, घनसावंगी, मंठा, जालना तालुक्यांतही पावसाचा जोर कायम होता.
या जोरदार पावसामुळे जालना शहरापासून वाहणाऱ्या कुंडलिका तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला मोठा पूर आला होता. याचा मोठा लाभ निम्न दधुनातील पाणीपातळीत वाढ होण्यात झाला. निम्न दुधना धरणात क्षमतेपक्षा जास्तीचा पाणीसाठा झाल्याने या धरणाचे १४ दरवाजे बुधवारी सकाळीच उघडले होते. त्यातून आजही विसर्ग सुरू असल्याचे सांगण्यात आले.
भोकरदन, जाफराबादेत पावसाची गरज
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात पाहिजे तसा दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे आजही या भागातील जुई, धामना प्रकल्पात पाहिजे तसा पाणीसाठा साचला नसल्याचे दिसून आले. एकूणच प्रकल्प कोरडे असले तरी पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाळ्याचे आणखी जवळपास दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या म्हणजेच ६०३ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.