मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
जालना : पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून रिक्त असलेल्या जागा तत्काळ भराव्यात, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रस्त्यावर सापडलेले ब्रेसलेट केले परत
परतूर : रस्त्यात सापडलेले दीड लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट प्रामाणिकरीत्या परत केल्याबद्दल सोमवारी सकाळी ११ वाजता परतूर शहरातील काळे दाम्पत्याचा कपिल आकात आणि मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी कपिल आकात, संतोष दहिवाळ, प्रवीण कव्हळे, शेख अब्बू यांची उपस्थिती होती.
भीमशक्तीचे विविध मागण्यांचे निवेदन
जालना : जिल्ह्यातील शेलगाव, मात्रेवाडी, हलदोला, केळीगव्हाण, नजिक पांगरी येथील गायरान जमिनीचे पंचनामे करून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना कायम कराव्यात, अशा मागणीचे निवेदन भीमशक्ती युवक आघाडी यांच्या वतीने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. या निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
स्वातंत्र्यसैनिकांसह डॉक्टरांचा सत्कार
जालना : शहरातील बाजीराव पाटील चव्हाण बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्यसैनिक व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. गांधी चमन परिसरातील शिवाजी हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात भगवान महाराज आनंदगडकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक सुखलाल कुंकलोळ, प्रभावती ताराचंद भंडारी, गंगाबाई वसंतराव शेलगावकर, रहेमत बेगम शब्बीर अली यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, प्रताप घोडके, प्रशांत बांदल, डाॅ. लता घोडके, डॉ. संजय जगताप, आशिष राठोड आदींची उपस्थिती होती.
पावसामुळे खरीप पिकांना जीवदान
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात गत दोन दिवसांपासून पडणाऱ्या श्रावण सरींमुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु, पिकांवरील रोगराई, किडीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
अंबड येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
अंबड : शहरात समाजभान टीम, भारतीय जैन संघटना व व्यापारी महासंघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी समाजभान टीमचे दादासाहेब थेटे, योगेश कव्हळे, गणेश मिरकड, सोपान पाष्टे, दत्तात्रय शिनगारे, अशोक धरमशी, द्वारकादास जाधव, प्रल्हाद उगले, विष्णू शेळके यांची उपस्थिती होती.
पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत
परतूर : तालुक्यातील आनंदवाडी येथील नऊपैकी तब्बल आठ रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. परिणामी, गेल्या १५ दिवसांपासून गावासह परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची कमालीची गैरसोय होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने वयोवृद्ध तसेच लहान मुुलांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.