अंबड रोडवरून ट्रक लंपास
जालना : अंबड रोडवरील इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ उभा असलेला एक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी ट्रक मालक शेख मोसीन शेख ताजमोहंमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल काकड अधिक तपास करत आहेत.
दिव्यांगास शिवीगाळ करून मारहाणीची धमकी
जालना : अंबड पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या एका दिव्यांगास शिवीगाळ करून अपमानित करत मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बाबासाहेब हरिभाऊ खरात (रा. इंद्रनगर, अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. पंचायत समिती कार्यालयात संशयित प्रकाश टकले याने आपण अपंग असल्याचे माहिती असताना सुध्दा शिवीगाळ करून हाकलून दिले. काय करायचे ते करून घे लंगड्या, असे म्हणत अपमानित करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस नाईक चव्हाण अधिक तपास करत आहेत.