जालना : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरणकडून कृषी पंपांची वीजतोडणी केली जात आहे. ही बाब माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विशद केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याचे खोतकर यांनी सांगितले.
कोरोनामुळे गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीत सर्व व्यवहार ठप्प होते. त्यात अतिवृष्टी, रोगराईमुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता वीज कंपनीने थकीत वीज बिलामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही बाब लक्षात घेऊन खोतकर यांनी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी योग्य तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले होते.
महावितरणने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थकीत वीज बिले भरणा न करणाऱ्या ग्राहकांची वीज तोडणी सुरू केली आहे. सध्या गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. त्यांना पाणी देणे सुरू आहे. अशा परिस्थितीत वीज तोडल्यास शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. त्यामुळे वीज कंपनीने तत्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी,अशी मागणीही खोतकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता आपण स्वत: यात लक्ष देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती खोतकर यांनी दिली.