रामनगर : जालना तालुक्यातील धानोरा येथील एका शेतकऱ्यास २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या पाच आरोपींना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहनासह ९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी रविवारी दिली.
धानोरा येथील निवृत्ती रामभाऊ तांगडे (वय ६५ वर्ष) यांना शनिवार, २२ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजता २५ लाखांच्या खंडणीसाठी चारचाकी वाहनात चार अनोळखी इसमांनी डांबून नेले होते. जालना-मंठा महामार्गावरील डुकरी पिंपरी टोलनाक्याजवळ मारहाण करून सोडून देण्यात आले. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मौजपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी गणेश तात्याराव श्रीखंडे, रामप्रसाद उर्फ बाळू दिगंबर शिंदे (दोघे, रा. सावरगाव हडप ता. जि. जालना), आकाश अशोक घुले (रा. मुकुंदपूर, नेवासा फाटा, जि. अहिल्यानगर), विशाल उर्फ गजानन डोंगरे (रा. सावरगाव हडप, ता. जि. जालना), आकाश तुकाराम रंधवे (रा. हडप ता. जि. जालना) यांना जेरबंद केले.
फरार आरोपी अनिकेत गोरख उकांडे (रा. अकोलनेर, जि.अहिल्यानगर) आणि श्याम चव्हाण (रा. साळेगाव तांडा ह.मु. सरस्वती मंदिराच्या पाठीमागे, जालना) यांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक विजय तडवी, पोलिस कर्मचारी प्रकाश जाधव, चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिंद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतीश गोफणे, नितीन कोकणे, प्रदीप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडीराम वाघमारे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, कैलास शिवनकर, सागर बाविस्कर यांनी केली.