पीयूष होलाणी यांना प्रथम दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:55+5:302021-01-17T04:26:55+5:30
परतूर : येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी सर्वप्रथम डॉ. पीयूष होलाणी यांना कोरोनाची लस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. ...
परतूर : येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी सर्वप्रथम डॉ. पीयूष होलाणी यांना कोरोनाची लस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. लस उपलब्ध झाल्याने आणि लसीकरण सुरू झाल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही आता दिलासा मिळणार आहे.
प्रारंभी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते फित कापून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, जिल्हा तपासणी पथक प्रमुख डॉ. राजेंद्र अंभोरे, डॉ. जी. एम. बांगड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर. नवल, गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर, प्रशांत अंभुरे, डॉ. संतोष काळे, डॉ. जगन्नाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १०० कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी दोन दिवसांपासून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. यासाठी तीन कक्ष उभारण्यात आले आहेत. ही मोहीम सुरळीत सुरू झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर. नवल यांनी सांगितले. यावेळी डॉ. महादेव उनवणे, डॉ. काकडे, डॉ. कराड, शेख वशीम आदींसह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
लसीकरण मोहीम यशस्वी करा
यावेळी आरोग्य विभागाचे जिल्हा तपासणी पथक प्रमुख डॉ. राजेंद्र अंभोरे म्हणाले की, या लसीकरण मोहिमेंतर्गत येथील रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लसीकरण लाभार्थ्यांनी निर्भयपणे लसीकरण करून घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असेही डॉ. राजेंद्र अंभोरे यांनी केले.