वडीगोद्री : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या जीपला अचानक आग लागली. ही घटना रविवारी सायंकाळी वडीगोद्री गावाजवळ घडली. या घटनेत जीपमधील पाच जणांसह दोन महिन्याचे बाळ बालंबाल बचावले.
बीड जिल्ह्यातील केज येथील रहिवासी खलील इनामदार हे रविवारी सायंकाळी कुटुंबातील पाच सदस्यांसह एका जीपमधून औरंगाबादकडे जात होते. ही जीप वडीगोद्री गावाजवळ आली असता अचानक इंजीनमधून धूर निघत होता. ही बाब लक्षात येताच खलील इनामदार यांनी जीप थांबवून जीपचे बोनेट उघडले. त्यावेळी इंजीनने अचानक पेट घेतला. तेव्हा वाहनातील सदस्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच खलील इनामदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी माती टाकून पेटलेली गाडी विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग मोठी असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेत साहित्य, इतर कागदपत्रे व जीप जळून खाक झाली.
या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. खलील इमानदार यांनी औरंगाबादवरून गाडी बोलावून औरंगाबादला रवाना झाले.