सध्या जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यातच अल्पवयीन व अप्रशिक्षित वाहन चालक मोठी वाहने भरधाव वेगाने चालविताना पारध आणि परिसरात दिसत आहे. या वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना, वाहतुकीचे कोणतेही नियम माहीत नसताना ते वाहन चालवित आहे. यामुळे त्यांच्यासह इतरांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. भोकरदन ते पारध रस्त्यावर आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहे. त्यात बहुतांश वाहनचालक हे अल्पवयीन व अप्रशिक्षित असल्याचे आढळून आले आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील जनतेकडून होत आहे.
अनेक वाहनमालक कमी रोजंदारीवर चालक मिळतो म्हणून अल्पवयीन आणि प्रशिक्षित वाहनचालकांच्या हाती आपल्या वाहनांचे स्टेअरिंग देतात. यामुळे अपघात होत आहे. ट्रॅक्टर, रिक्षा, कार ही वाहने अप्रशिक्षित वाहनचालक भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे रस्त्यावर पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.