पारध : जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात ज्या भागात कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, तेथील अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परंतु, बर्ड फ्लू साथीचा मका विक्रीवर परिणाम झाला असून, मक्याचे दर गडगडले आहेत.
भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या मक्याला १,२०० ते १,३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. वास्तविक १,५०० ते १,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बर्ड फ्लूच्या धास्तीमुळे पोल्ट्री चालकांकडून होणारी मक्याची मागणीही कमी झाली आहे. परिणामी बाजारपेठेतील मक्याचे दर कमी होत आहेत. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने कधीही पाऊस पडून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. अनेक शेतात मका सोंगणी करून गंजी मारून ठेवलेल्या आहेत. त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. काही शेतकरी मक्याची काढणी करून मिळेल त्या भावात विकत आहेत तर काही शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्यावर्षी कोरोना आणि पाऊस आणि यावर्षी बर्ड फ्लूमुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
कोट
रात्रीचा दिवस करून आम्ही मक्याचे उत्पादन घेतले. पोल्ट्री चालकांकडून मक्याला चांगली मागणी होती. परंतु, बर्ड फ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांकडून मक्याची मागणी कमी झाली आहे. अनेकांनी काही दिवसांसाठी पोल्ट्री बंद केल्या आहेत. त्यामुळे मक्याचे दर कमी झाले असून, पाऊस पडला तर अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
संजय लोखंडे,
शेतकरी, पारध (बु.)