वडीगोद्री (जालना) : शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकसान भरपाईच्या निधीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील, त्याशिवाय न्याय मिळणार नाही," अशा अत्यंत कठोर शब्दांत जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचा निधी अद्यापही जमा झाला नाही, या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारला घेरले. ते म्हणाले, "शेतकऱ्यावर जेव्हा मोठे संकट येते, तेव्हा त्याला आर्थिक हातभार लावणे ही सरकारची जबाबदारी असते. मात्र, हे सरकार केवळ तात्पुरता आनंद देणारे आहे. मागील ७५ वर्षांपासून हेच सुरू आहे, फक्त आशेला लावायचे."
लवकरच मोठे आंदोलन:यावेळी जरांगे पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु लगेचच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. दिवाळी पाडवा आणि भाऊबीज झाल्यानंतर ते शेतकरी तज्ज्ञ आणि संघटनांसोबत आंतरवाली सराटी येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर लवकरच तारीख जाहीर करून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. "शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आहे," असे आवाहनही त्यांनी केले.
'भुजबळ म्हणजे फुसका फटाका':यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवरही टीकास्त्र सोडले. "भुजबळ म्हणजे अलीबाबा फुसका फटाका आहे, तो वाजत नाही," अशा शब्दांत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ओबीसी नेत्यांची सध्याची धडपड केवळ त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सुरू असून, त्यांना ओबीसी समाजाचे काही देणेघेणे नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण आणि फडणवीसांवर विश्वास:मराठा आरक्षणाच्या जीआरबद्दल बोलताना ते म्हणाले की, तो जीआर कोणीही रद्द करू शकत नाही आणि त्याला हात लावायला कोणाच्या बापाचं टप्पर नाही. मराठवाड्यातील मराठा समाज या जीआरमुळे एक ना एक दिवस १०० टक्के आरक्षणात जाणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, "फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसला आहे, तो त्यांनी ढळू देऊ नये. जीआर 'ओके' आहे, थोडाफार बिघडला असेल तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. फक्त प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे."कुणबी-मराठा वादावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते जातवान कुणबी मराठा असून, दीडशे वर्षांपासूनच्या आरक्षणाला होणारा विरोध पाहून आता विरोधकांबद्दल घृणा यायला लागली आहे. त्यांनी तायवाडे यांच्या वक्तव्यावरही तीव्र प्रतिक्रिया दिली.
तुटकी-मुटकी दिवाळी साजरी करा:"शेतकऱ्यांनी काही का होईना, तुटकी मुटकी दिवाळी साजरी करावी," असे भावनिक आवाहन त्यांनी केले. परंतु, सरकार जाणूनबुजून शेतकऱ्यांना मदत करत नाही, तात्पुरता आनंद देत आहे. त्यामुळे आता सगळे शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन रस्त्यावर यावे लागेल आणि सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत, पर्याय नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
Web Summary : Manoj Jarange Patil criticized the government for neglecting farmers' compensation. He warned of a major protest after Diwali if funds aren't disbursed. He also attacked OBC leaders and expressed confidence in the Maratha reservation and Devendra Fadnavis's commitment.
Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने किसानों के मुआवजे की अनदेखी के लिए सरकार की आलोचना की। उन्होंने दिवाली के बाद बड़ा विरोध प्रदर्शन करने की चेतावनी दी अगर धन का वितरण नहीं किया गया। उन्होंने ओबीसी नेताओं पर भी हमला किया और मराठा आरक्षण और देवेंद्र फडणवीस की प्रतिबद्धता में विश्वास व्यक्त किया।