जाफराबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जाफराबाद, माहोरा येथील भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले होते. अचानक बाजार बंदच्या निर्णयामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांची चांगलीच कोंडी झाली.
माहोरा येथील आठवडी बाजार हा जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखल्या जातो. या बाजारात जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील ३० ते ३५ गावांतील नागरिक येतात. त्यातच प्रशासनाने महिनाभर आठवडी बाजार बंद ठेवल्याने फळ, भाजी उत्पादक शेतक-यांनी भाजीपाला कुठे विकायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडी बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. आठवडी बाजारात भाजीपाल्याची विक्री करून पुढील आठवडाभर शेतकरी आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु, कोरोनामुळे तब्बल एक महिना आठवडी बाजार बंद राहणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी फळ, भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी लवकरच करण्याचे आदेश दिले आहे.