जालना/राजूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. हल्ला झाला त्यावेळी जालना जिल्ह्यातील आठ पर्यटक जम्मू-काश्मीर येथे होते. हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर यांनी दिली. या पर्यटकांमध्ये राजूर येथील राजूरेश्वर गणपती मंदिराचे पुजारी संदीप साबळे यांचादेखील समावेश आहे.
हल्ला झाला तेव्हा भोकरदन तालुक्यातील राजूर येथील संदीप साबळे पत्नी व मुलासह घटनास्थळापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होते. सुदैवाने साबळे कुटुंब सुखरूप असून, त्यांनी कुटुंबीयांसोबत संवाद साधला आहे. बुधवारी दुपारी ते श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत.
राजूर येथील श्री गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेशराव साबळे यांचा मुलगा संदीप ऊर्फ मनोज साबळे, सून तेजस्विनी साबळे व नातू कौस्तुब साबळे, हे तिघे जण काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. २० एप्रिल रोजी मुंबईहून ते काश्मीरकडे रवाना झाले. पहलगामपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मिनी स्वित्झर्लंड या हॉटेलात मुक्कामी थांबले होते. मंगळवारी सकाळी साबळे कुटुंब तयारी करून फिरण्यासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. गाइडने त्यांना हल्ल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती, असे त्यांचे वडील गणेश साबळे यांनी सांगितले.
जालन्यातील कुटुंब सुरक्षितजालना शहरातील संजय राऊत व सोनल राऊत व आदर्श राऊत हे श्रीनगर येथे गेले असून, ते सध्या सुखरूप असल्याचे आदर्श संजय राऊत यांनी दूरध्वनीद्वारे प्रशासनास सांगितले आहे. जालना शहरातील समर्थनगर येथील डॉ. विठ्ठल गाडेकर, वर्षा गाडेकर हेही पर्यटनासाठी जम्मू-काश्मीर येथे गेले असून, ते सध्या श्रीनगर येथे सुखरूप असल्याचे जालना जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.