- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : देशमुख कुटुंब आमरण उपोषणाला बसण म्हणजे दुर्दैव आहे. देशमुख कुटुंब उपोषणाला बसले तर मी राज्यातील मराठा समाजाला सांगतो की, सगळ्यांनी मस्साजोगकडे जायचं. सगळ्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहायचं, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. आज दुपारी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
जरांगे पुढे म्हणाले, आज देशमुख कुटुंब संकटात आहे, माणुसकी म्हणून बघायच असेल तर देशमुख कुटुंबाकडे बघावा लागेल. उपोषण साधी गोष्ट नाही, माझी त्यांना विनंती आहे की, उपोषण करू नका. संतोष देशमुख यांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचले होते. ते कोणत्या मंत्र्यांनी करायला लावलं, त्यात एका बाईला आणि पोलिसांना कोणाकोणाचे फोन केले. धनंजय मुंडे यांनी फोन केले का? याचे देखील सीडीआर काढले पाहिजे. यात बडा नेता कोण, बडा नेता कोण हे उघड पडू द्या. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे एखाद शिष्टमंडळ तिथे जाण गरजेचे आहे, अशी मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली.
मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार धस यांची भेट झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली होती, मात्र ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केला यावर बोलताना जरांगे म्हणाले, त्या विषयात मला काही बोलायचं नाही तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी एवढा जीव लावला होता. समाजाने देखील तळ हातावर घेतलं होतं. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता तर तुम्ही सर्व सांगायला पाहिजे होतं. मी समाजाची गद्दारी करू शकत नाही. माझ्यावर पक्षाचा दबाव आहे असं आमदार धस यांनी म्हणायला पाहिजे होतं. मी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो मराठ्यांसाठी पण मी धनंजय मुंडे यांना भेटायला जाऊ शकत नाही. सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, असा संताप जरांगे पाटील यानी व्यक्त केला.