जालना : बाजारातून सामान घेऊन येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फुलबाजार येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
जालना शहरातील बिहारीलाल नगर येथून सुषमा चांदमल पाटणी या बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फुलबाजार येथे गेल्या होत्या. सामान खरेदी करून त्या घराकडे येत होत्या. फुलबाजार येथेच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील पॅडन असलेली ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. चोरट्यांनी चेहऱ्यावर रूमाल बांधलेला असल्याने चेहरा ओळखता आला नाही. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सानप, पोउपनि. भताने, पोउपनि वाघ, पोउपनि. रूपेकर यांनी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनाम करून परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, चोरटे सीसीटीव्हीत कैद असल्याचे दिसून आले. सदरील चोरटे सराईत गुन्हेगार असून, पोलीस त्यांना लवकरच ताब्यात घेतील, असे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितले. याप्रकरणी सुषमा चांदमल पाटणी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटे लवकरच जेरबंद करू
सदरील घटनेच्या तपासासाठी आम्ही पथक नेमले आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. चोरट्यांनी या अगोदरही चोरीच्या घटना केलेल्या आहेत.
संजय देशमुख, पोनि. सदर बाजार पोलीस ठाणे