स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर अधिकचा भर
स्वच्छता - जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे स्वच्छतेवर अधिकचा भर आहे.
निर्जंतुकीकरण - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसोबतच रुग्णालय परिसर निर्जंतुकीकरण करण्यावरही भर देण्यात आला आहे.
औषध भांडार - उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बहुतांश सर्वच औषधे औषध भांडारातून द्यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.
बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची हजेरी वाढली
जालना येथील शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात कोरोनापूर्वी सरासरी ८०० ते ९०० रुग्ण उपचारासाठी येत होते.
सध्या कोरोना बाधितांची संख्या घटल्याने बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. मागील महिन्यात असलेली २०० ची ओपीडी आता साडेचारशेच्याही वर गेली आहे.
कोरोना काळात खासगी रुग्णालयांचा आधार
कोरोनाची दहशत पसरलेली असल्याने सर्दी, खोकला, ताप आदी आजार अनेक नागरिक अंगावर काढत होते. अधिक त्रास होऊ लागल्यानंतर खासगी रुग्णालयात जावून उपचार घेण्याची वेळ आली होती.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक विविध आजारांवर घरगुती उपाय करीत होते. काहींनी कोरोनाच्या फैलावात आयुर्वेदिक औषध खाण्यावरही अधिकचा भर दिला होता.
रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा मिळावी...
कोरोना बाधितांची संख्या आता घटली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग असो किंवा अंतररुग्ण विभाग असो, उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि चांगल्या दर्जाची सेवा मिळायला हवी. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.
- फारूख पठाण
शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर बाह्य रुग्ण विभागाच्या कालावधीत आपापल्या विभागात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेक वेळा गैरसोयीचा सामना करावा लागतो. काही औषधे बाहेरून आणण्यास सांगतात. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
- सुभाष बोर्डे
रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा
कोरोना बाधितांची संख्या घटल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, अंतररुग्ण विभागातील सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया विभागातील तयारीही पूर्ण झाली असून, गरजू रुग्णांवर वेळेत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक.