जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ड्राय रन होणार असून, यासाठी ७५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.
हे ड्राय रन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे होणार आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास या ड्राय रनला सुरुवात होईल. त्यानुषंगाने शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब यांनी ड्राय रनमध्ये सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या ड्राय रनसाठी आरोग्य विभागातील ७५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या ७५ जणांना तासभराअगोदरच मोबाइल मॅसेज येईल. त्यानंतरच त्यांना लसीकरणासाठी येता येईल. प्रत्येक केंद्रावर डॉक्टरांसह ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांचा समावेश आहे. लसीकरणासाठी तीन रूम तयार करण्यात आल्या आहेत. हा ड्राय रन बारा वाजेपर्यंत चालणार असल्याचेही डॉ. खतगावकर यांनी सांगितले.
अशी दिली जाणार लस
लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीस मोबाइलवर मेसेज येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी संबंधित व्यक्तीचा मोबाइलवर आलेला मेसेज पाहूनच त्याला केंद्रात सोडतील. पहिल्या रूममध्ये कागदपत्रांची तपासणी केली जाईल. दुसऱ्या रूममध्ये लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या रूममध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तीस अर्धा तास निगराणीत ठेवले जाईल. त्यानंतर शिक्षक कोविन अॅपवर संबंधित व्यक्तीची माहिती भरणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
यांच्यावर राहील जबाबदारी
डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांच्यावर लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना तसे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.