क्रिकेट स्पर्धेत ग्रीन गोल्ड संघाची बाजी
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे घेण्यात आलेल्या आरपीएल क्रिकेट स्पर्धेत ग्रीन गोल्ड क्रिकेट संघाने बाजी मारली. या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर शिवमुद्रा क्रिकेट संघाने द्वितीय पारितोषिक पटकाविले. अंतिम सामन्याचा रोमांच पाहण्यासाठी आष्टी व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
जनसंघर्ष यात्रा २३ जानेवारी रोजी शहरात
जालना : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा २३ जानेवारी रोजी जालना शहरात येणार आहे. यानिमित्त आनंदनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी दिली.
स्वच्छता मोहीम राबिवण्याची मागणी
जालना : शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीपात्रात पुन्हा अस्वच्छता झाली असून, पानवेलीचाही वेढा नदीपात्राला पडला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नदीचे पात्र अस्वच्छ होत आहे. याकडे लक्ष देऊन प्रशासनाने नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
मोकाट जनावरांमुळे नागरिकांची गैरसोय
भोकरदन : शहरातील बाजारपेठेसह मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी होत असून, सर्वसामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.