मंजुरीपत्राचे वाटप
जालना : अंबड तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी रमाई घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना उपसरपंच शिवाजी गोंटे यांच्या हस्ते मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी द्रौपदाबाई खरात, ग्रामसेवक एन. डी. खरात, मदन शेळके आदींची उपस्थिती होती.
श्रीधर महाराज इंगळे यांची निवड
मंठा : येथे राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची रविवारी मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज मालेगावकर व जालना जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कांगणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी श्रीधर महाराज इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी धर्मकीर्ती सावंत आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थित होती.
पडलेल्या भिंतीचा पंचनामा
परतूर : तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ वाळूचा साठा करण्यात आला. त्यामुळे दाब पडून शाळेची संरक्षक भिंत १० मीटर कोसळली आहे. दरम्यान, शनिवारी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पी. आर. सारडा यांच्या पथकाने चिंचोली येथे येऊन पाहणी करून पंचनामा केला. याप्रसंगी नागरिक उपस्थित होते.
संदुर माझे कार्यालय अभियानास प्रारंभ
जाफराबाद : तालुक्यात सुंदर माझे कार्यालयअभियानांतर्गत विविध अभिलेखे, कार्यालयाची रंगरंगोटी, सुशोभिकरण यासह झिरो पेंडन्सीसारखे उपक्रम राबविणे सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जाफराबाद तालुक्यातील सुमारे ५९४ शिक्षकांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत करण्यात येत आहे. दरम्यान, येथील गट साधना केंद्रात तीन दिवसीय शिबिर घेण्यात आले.
योग जागरण समितीतर्फे स्पर्धा
जालना : जागतिक योग दिनानिमित्त योग जागरण समितीतर्फे निबंध स्पर्धा घेण्यात येत आहेत. निबंध स्पर्धेचे कोरोना सोबत जगण्यासाठी योगाचे महत्व, आंतरराष्ट्रीय योग दिन, योग काल, आज आणि उद्या असे विषय ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मराठी व हिंदी भाषांसह सहाशे शब्दमर्यादा आहे. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा.
महिलेचा विनयभंग
बदनापूर : तालुक्यातील मुरूमखेडा येथील एक महिला शेतीचे काम आटोपून घरी येत असताना रस्त्यात एका इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पूल उभारण्याची मागणी
घनसावंगी : राजाटाकळी येथील गोदावरी नदीवर पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. रवींद्र आर्दड, गणेश आर्दड, उध्दव आर्दड, शेषराव आर्दड, डिगांबर आर्दड, ज्ञानेश्वर आर्दड, कालिदास राऊत हे उपस्थित होते.