घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तालुक्यातील नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत.
तालुक्यात यंदा ८२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. घनसावंगी मंडळात सर्वाधिक १०६७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ आंतरवाली मंडळात १०४३.४ मिमी, रांजणी मंडळात १०३२.२ मिमी, तीर्थपुरी मंडळात ९६५.१ मिमी, राणीउंचेगाव मंडळात ९३७.९ मिमी, कुंभार पिंपळगाव मंडळात ८९९.० मिमी, जांब समर्थ मंडळात ८०४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओलांडली आहे. तालुक्यात सरासरी ८७५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ६३ हजार ३९१.२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. काही भागात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे बांध फुटले असून, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडल्या आहेत.
अनेक पिकांमध्ये अद्यापही पाणी उभा आहे. कापसाच्या पिकाला लाल्या रोगाने घेरले आहे. शिवाय, पावसाच्या व वाऱ्याच्या वेगामुळे कापूस, तूर, मका, ऊस ही पिके भुईसपाट झाली आहेत. याचा फटका ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोट
मी नियमित खरीप, रब्बी हंगामातील पीकविमा भरत असतो. यावर्षीही विमा प्रीमियमसाठी दोन हजार रुपये भरलेले आहेत. माझे एका एकरचे तुरीचे पीक पावसाने बाधित झाले आहे. सोयाबीन व मूगही हातचा गेला आहे. शासनाने आम्हा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
एकनाथ जाधव, शेतकरी घनसावंगी
कोट
मागील वर्षी पिकांचे नुकसान होऊनही कंपनीने विमा भरपाई दिलेली नाही. या वर्षी तालुक्यात पावसाने हाहाकार केला आहे. त्यामुळे या वर्षी तरी विमा कंपनी नुकसानभरपाई देईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी नुकसान होऊनही कंपनीने भरपाई दिली नाही तर भविष्यात कोणताच शेतकरी विमा प्रीमियम भरणार नाहीत.
अशोक हेमके, शेतकरी, बहिरगड
फोटो