जालना : भारतीय कापूस निगम लिमिटेडने दिलेल्या निर्देशानुसार सोमवार ते गुरुवारपर्यंत कापूस खरेदी बंद राहणार असून, शेतकऱ्यांनी या कालावधीत कापूस विक्रीसाठी न आणता आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वप्रथम सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून येथे कापूस खरेदी सुरू आहे. तथापि, महाराष्ट्र जिनिंग कॉटन असोसिएशनने ११ व १२ जानेवारीदरम्यान, कापूस खरेदी बंद ठेवण्याचे भारतीय कापूस निगम लिमिटेडला कळविले होते. तसेच १३ व १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण असल्याने या कालावधीत कापूस खरेदीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, खरेदी केंद्र व उपकेंद्रांवर यापूर्वी दिलेल्या कापसाचे ऑनलाईन पेमेंट देण्यासाठी कर्मचारी हजर राहतील. तरी शेतकऱ्यांनी या कालावधीत कापूस विक्रीसाठी आणू नये व आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन सभापती अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव रजनीकांत इंगळे यांनी केले आहे.