जालना : केंद्र सरकारच्यावतीने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये निर्यात वाढीसाठी एक्सपोर्ट हब तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती निर्यात वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे याचा स्वतंत्र आराखडा तयार करून दर महिन्याला या समितीची बैठक नियमितपणे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. देशातील वेगवेगळ्या दर्जेदार उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी आणि त्यातून जास्तीत जास्त परकीय चलन देशात यावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वन डिस्ट्रीक्ट व प्रोडक्ट ही योजना आणली आहे. असे असले तरी प्रत्येक जिल्ह्यातून आज घडीला ज्या मशीन्स तसेच अन्य खाद्य उत्पादने, बी-बियाणे यासह जे काही शक्य असेल ते परेदशातील बाजारपेठेची मागणी, त्यातील गरज लक्षात घेऊन तशी उत्पादने करण्यासाठी आहेत त्या उद्योजकांसह नवीन उद्योजकांना या योजनेतून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी जालन्यातून निर्यात वाढावी म्हणून समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीत उद्योजक सुनील रायठठ्ठा, नितीन काबरा, जितेंद्र राठी तसेच साॅफ्टवेअर इंजिनिअर अक्षय गेही यांचा समावेश आहे. यात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड हे या समितीचे अध्यक्ष असून, समन्वयकाची भूमिका ही जिल्हा उद्योग केंद्र निभावत आहे. त्यासाठी जिल्हा महाव्यस्थापक के. व्ही. खरात या काम पाहत आहेत. या समितीची एक बैठक पार पडली असून, त्या बैठकीत जिल्ह्यातील निर्यातीच्या संबंधात येणाऱ्या अडचणी तसेच निर्यात वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे यावर विचारविनिमय करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चौकट
जालन्यातून निर्यात करणारे उद्योग
कलश सीडस् - भाजीपाल्याची बियाणे, विनोदराय इंजिनिअरिंग आणि पूजा रोटोमॅक या दोन्ही कंपन्यांकडून प्लास्टिकच्या टाक्या तयार करण्यासाठीची मशिन्स, वैदही इंडस्ट्री -मसाले, ठाकूरजी स्लोवेक्स गुरू ॲग्रोटेक, भक्ती एक्सट्रक्शन, भूमी कोटेक्स या चारही कंपन्यांकडून सोयाबीनपासून उत्पादित पशुखाद्य- ढेप, पोलाद स्टील, सफल सीडस्, विश्वकर्मा एंटरप्राईजेसकडून विविध प्रकारच्या डाय-साचे तयार केले जातात. यासह एनआरबी बेरींग्जकडून बेरींग्जची निर्यात केली जाते.
चौकट
२१ ते २९ दरम्यान निर्यात सप्ताह
पुणे येथील केंद्र सरकारच्या निर्यातवृद्धी उपक्रमाला चालना देण्यासाठी डीजीएफटी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वर उल्लेखीत निर्यातदार उद्योगांसह अन्य उद्योगांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच लवकरच एक ॲप तयार केले जात असून, त्यावर सर्व ती माहिती देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच २१ ते २९ सप्टेंबर दरम्यान निर्यातवृद्धीसाठी विशेष सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. त्यात तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्यानांचे आयोजन करणे, निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी तसेच संधी बाबत माहिती देण्यात येणार आहे.
के. व्ही. खरात, जिल्हा महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जालना