लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी सकाळी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल एकाने नांदेड येथून घेऊन जालना येथील व्यक्तीला विक्री केले होते.जालना येथील एका व्यक्तीकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून बुधवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका कारमध्ये (क्र.एम.एच.२८- ए.झेड.१२८७) बसलेल्या मनोज मुकुंद वाळके (२६) याची चौकशी करीत तपासणी केली. त्यावेळी मनोज याच्या कमरेला गावठी पिस्टल, मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरील पिस्टल हे अजितसिंग मलखसिंग कलाणी (रा.चंदनझिरा) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी कारवाई करून कलाणी याला ताब्यात घेतले. कलाणी याने ते पिस्टल नांदेड येथून विकत घेऊन वाळके याला विक्री केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व कार जप्त केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, विलास चेके, संदीप मांटे यांच्या पथकाने केली.चालू वर्षात जालना शहरासह परिसरातून तब्बल सात पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने चार, दरोडा प्रतिबंधक पथकाने दोन व सदरबाजार पोलिसांनी एक पिस्टल जप्त केली आहे. त्यामुळे पिस्टल शहरात आणते कोण आणि कोठून याचा शोध घेऊन आरोपींच्या मुस्क्या आवळण्याची गरज आहे.
गावठी पिस्तुलासह दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:26 IST