जालना : शास्त्रीयदृष्ट्या प्रत्येकाला किमान सहा ते आठ तासांची झोप आवश्यक आहे; परंतु आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या वातावरणात एवढी झोप होणे शक्य नसल्याने अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तणावमुक्त राहून किमान आठ तास झोप मानवी शरीराला नवीन ऊर्जा निर्माण करून देते. यामुळे आरोग्यही चांगले राहते. लहान मुलांसाठी देखील झोपेच नियम आहेत.
किमान सहा तास झोप आवश्यक
प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या संस्था, शेतीत काम करीत असतो. श्रम झाल्यानंतर तेवढाच आराम देखील आवश्यक असतो. हा आराम खऱ्या अर्थाने गाढ झोपेतून मिळतो. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते.
रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
चांगली झोप ही मानवी आरोग्यासाठी एक प्रकारची संजीवनी आहे. यामुळे झोपेपूर्वी तणावमुक्त होणे आवश्यक आहे. यातूनच तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. झोप आणि तुमच्या आरोग्याचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. चांगल्या झोपेसाठी व्यायाम देखील गरजेचा असून, हल्ली याकडे दुर्लक्ष होत आहे.
अपुऱ्या झोपेचे तोटे
अपुऱ्या झोपेमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होते.
झोप व्यवस्थित न झाल्यास शरीरातील उष्णता वाढून रक्तदाब आणि अन्य आजार जडू शकतात.
व्यवस्थित झोप न झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामकाजावरही दिसून येतो.
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
चांगली झोप यावी म्हणून आहार आणि विहार या दोन्हीला तेवढेच महत्त्व आहे. आजची पिढी ही जंक फूड आणि हॉटेलमधील पदार्थ खाण्यास प्राधान्य देत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होत असून, मोबाइलही याला कारणीभूत आहे.
किमान सहा तास झोप
चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने किमान सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. ही झोप चांगली झाल्यानंतर तुमच्या शरीराला आराम मिळून तुमचे आरोग्य चांगले राहण्यासह आणि मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत हाेत असल्याचे दिसून येते.
- डॉ. संजय रुईखेडकर