जालना : पाच दिवसांपासून जालना शहर परिसरात सूर्य आग ओकत आहे. आता पुन्हा बुधवारपासून तीन दिवस उष्णता वाढण्याचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. २ मेपर्यंत तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले गेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानात सुमारे ४ ते ५ अंशांची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मागील आठवड्यात उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता. आता पुन्हा २९ ते २ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कमाल तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
दिवसाचे तापमान मंगळवारी ४२ अंशांवर पाेहोचल्याचे दिसून आले. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तापमान वाढत जाईल...पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.डॉ. प्रा. पंडित वासरे, हवामानशास्त्रज्ञ
काय काळजी घ्याल?हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० एप्रिल ते २ मे दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत घर किंवा ऑफिसच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्णतेमुळे तब्येत बिघडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोबाइलचा वापर कमी करावा; कारण मोबाइल फुटण्याची शक्यता असते. तसेच दही, ताक, सरबत इत्यादी थंड पेय पदार्थांचे सेवन करावे.