अवैध वाळू वाहतूक ; रस्त्यांची दुरवस्था
भोकरदन : तालुक्यातील नांजा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा, वाहतूक राजरोस सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाळूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा रोखण्यासह रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
रस्ता सुरक्षाबाबत चालकांना मार्गदर्शन
जालना : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी शिकावू वाहनचालकांना मार्गदर्शन केले. यावेळी सचिन झाडबुके, हनुमंत सुळे, उदय शिंदे, सुभाष दिघे, आत्माराम मुंढे यांच्यासह शिकावू चालकांची उपस्थिती होती.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दारू कोठेही उपलब्ध होत असल्याने युवा पिढी व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. तळीरामांचा महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी लक्ष देवून अवैधिरत्या दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
फूटपाथ नसल्याने पादचाऱ्यांची गैरसोय
अंबड : शहरातून जाणाऱ्या जालना- बीड रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु, या मार्गावर फूटपाथ नसल्याने पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय, अपघाताचाही धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महामार्गाच्या कामादरम्यान फुटपाथ तयार करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.