जाफराबाद : शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२१ अंतर्गत सिंचन विहीर योजना व राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन सिंचन विहीर योजना सुरू केली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. या योजनेचा लाभ देताना पात्र लाभार्थ्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, नसता कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. संतोष दानवे यांनी दिला आहे. बुधवारी आ. दानवे यांनी तहसील कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
ज्या अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांची या योजनेमध्ये निवड झाली आहे, अशा कोणत्याही लाभार्थ्याने अधिकारी, कर्मचारी व दलाल यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूण ३६ प्रकारच्या छोट्या-मोठ्या योजना आहेत. तुषार संच, ठिबक, कांदा चाळ, सोलार पंप, पाइपलाइन, पीव्हीसी पाइप अशा अनेक योजनांसाठी खुल्या प्रवर्गातील शेतकरीसुद्धा महा-डीबीटी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या योजनेच्या ऑनलाइन अर्जासाठी मुदत नाही. आपण संपूर्ण वर्षामध्ये केव्हाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा
तालुक्यातील जास्तीत -जास्त अनुसूचित जाती-जमाती व खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून सर्व कृषीविषयक शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, तसेच या योजनेतील लाभार्थ्यांची निवड ही ड्रॉ पद्धतीने केल्या जात असल्याने त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होत नाही. त्यामुळे कोणी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.