लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे वास्तुशांतीच्या दिवशीच क्षुल्लक कारणावरून घरावर हल्ला करण्यात आला. या घटनेत घरासमोरील चार चाकी व दुचाकीची तोडफोड करून जातिवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी अकरा जणांविरूध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आष्टी येथील रहिवासी दिलीप काशीनाथ भाळशंकर यांच्या घराची शनिवारी वास्तुशांती होती व रविवारी सत्यनारायणाची पूजा होती. सर्व कार्यक्रम आटोपून ते रात्री घराच्या गच्चीवर मोबाईल वर बोलत असताना त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या हॉटेलमधील तरूणांसोबत वाद झाला या वादामुळे संतप्त झालेल्या युवकांनी शिवीगाळ केल्याने वाद वाढला. भाळशंकर यांनी युवकांना समजावून सांगितले. मात्र ते ऐकण्याच्या तयारीत नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्रांना बोलावून भाळशंकर यांच्या घरासमोरील कार तसेच दुचाकीची मोडतोड केली. या प्रकरणी दिलीप भाळशंकर यांच्या तक्रारीवरून अंगद थोरात, सचिन बरकुले, बाबू नखाते, रमेश शेंडगे, दिगंबर बडवने, गजानन बडवने, अजय बरकुले, गणेश वैद्य, उत्तम सातव, रमेश फुलारी, मोहन थोरात यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वास्तुशांतीच्या दिवशीच घरावर हल्ला; अकरा जणांविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:25 IST