भोकरदन ( जालना) : येथील शासकीय औद्योगिक संस्थेला स्वातंत्र्यसेनानी पुंडलिकराव हरी दानवे यांचे नावे देण्यात आले आहे. या नामांतर सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 22 वर्षापासूनचे एकमेकांचे राजकीय विरोधक माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे आणि पुंडलिकराव दानवे यांचे चिरंजीव माजी आमदार चंद्रकांत दानवे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. यावेळी झालेल्या भाषणात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
यावेळी माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, पुंडलिकराव दानवे यांचा इतिहास सर्वांनाच कळायला पाहिजे. त्यांच्या सहवासात मी अनेक गोष्टी शिकलो. येणाऱ्या काळात औद्योगिक संस्थांना लागणारे कुशल मनुष्यबळ आपल्या भोकरदनच्या आयटीआय मधून तयार व्हावे यासाठी सहकार्य करू, असेही दानवे म्हणाले. यावेळी आमदार संतोष दानवे, राष्ट्रवादी शरद पवारचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी सभापती गणेश फुके, योगेश जोशी, रवींद्र सासमकर, विनोद गावंडे, राजेंद्र जोशी, गणेश ठाले, रमेश सपकाळ, प्रल्हाद गोरे, लक्ष्मण ठोंबरे, आयटीआयचे डी. एम. राठोड, प्राचार्य के. बी. ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुंडलिकराव म्हणाले तू आमदार, खासदार होशीलयावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुंडलिक हरी दानवे यांच्या सहवासातील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांचे अनेक किस्से सांगितले. ते दोन वेळा खासदार कसे झाले त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी त्यांनी सर्वांना सांगितली. पुंडलिकराव हजरजबाबी होते. ते कोट्या करण्यात परफेक्ट होते. मला नोकरीचा कॉल आल्यानंतर मी त्यांचा सल्ला घेण्यासाठी घरी गेलो. त्यावेळी ते म्हणाले तू फौजदार काय होतो, आमदार व्हाव खासदार व्हाव. त्यांचे बोलणे खरे ठरले. मी आमदारही झालो खासदार व मंत्रीही झालो. पुंडलिकराव बद्दल माझ्या मनात आदर आहे व तो कायम राहील. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना उद्देशून ते म्हणाले, आपण राजकीय विरोधक आहोत. मात्र विकासासाठी एकत्र आलो पाहिजे. एकमेकांच्या घरी जाणेयेणे ही आपली पहिल्यापासून परंपरा आहे. आता तू माझ्याकडे ये नाहीतर मी तुझ्याकडे येतो, असे म्हणताच एकच हशा पिकला.
पुंडलीकराव दानवे यांच्या संस्कारात वाढलोते पुढे म्हणाले, आम्ही पुंडलीकराव दानवे यांच्या संस्कारात वाढलो, हे कधीही नाकारत नाही. त्यांच्या बद्दल आमच्या मनात आजही आदर आहे, ते पदासाठी पक्ष सोडून गेले नाही. राजकारण बाजूला ठेऊन आपण संबंध जोपासले पाहिजे. मी चंद्रकांत दानवे यांचा विवाह जुळविला, त्यांच्या अनेक सुख दुःख च्या कार्यक्रमात असतो. मात्र, चंद्रकांत दानवे आमच्याकडे आला नाही, हे बरोबर नाही. तु विकास काम घेऊन माझ्याकडे ये, ते काम मी करून देतो. तुम्ही पुंडलिकराव दानवे यांचे संस्कार जोपासा, असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत दानवे यांना यावेळी दिले.
वडिलांचे नाव देशात जाईलतर माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणाले की, वडील स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरी दानवे यांनी रझाकारांशी लढा दिला. त्याचप्रमाणे ते राजकारणात ही संत म्हणूनच राहिले. या आयटीआय मधून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर आता पुंडलिक हरी दानवे यांचे नाव राहणार आहे. त्यांचे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल. आयटीआयला त्यांचे नाव दिल्याने सर्वांना आनंद झाला आहे. दादा तुम्ही व मी आपण दोघेही माजी झालो. या ठिकाणी आजी पदाधिकारी उपस्थित पाहिजे होता, असे म्हणत असतानाच आमदार संतोष दानवे हे व्यासपीठावर येताच पुन्हा एकदा हशा पिकला. मला कायम आजी ठेवायावेळी बोलताना आमदार संतोष दानवे म्हणाले की, पुंडलिक हरी दानवे हे एक आदर्श राजकारणी होते. त्यांचा सहवास मला जरी कमी लाभला तरी ते आमच्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत. त्यांचे नाव आयटीआयला दिल्याने आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. माझे वडील रावसाहेब दानवे यांच्याकडून त्यांच्या कार्याची नेहमीच माहिती मिळते. त्यांच्या घरण्यासोबत आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आयटीआयच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच तुम्ही दोघेही आता माजी झाले आहेत, मात्र मी आजी आहे, तुम्ही असेच माजी रहा व मला कायम आजी ठेवा, असा टोलाही आमदार दानवे यांनी लगावला.