जालना : विषाणूजन्य सांसर्गिक असलेला गोवर हा आजार मुख्यत: बालकांमध्ये आढळतो; परंतु बालपणी ज्याला गोवर झाला नाही त्याला भविष्यात गोवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठलाही ताप, अंगावरील पुरळाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
बालकांच्या महत्त्वाच्या सहा सांसर्गिक आजारामध्ये गोवरचा समावेश करण्यात आला आहे. विशेषत: कुपोषित मुलांसाठी हा आजार अधिकच धोकादायक ठरणारा आहे. आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या लसीकरणामुळे गोवरची साथ कमी झाली आहे; परंतु असे असले तरी ताप, अंगावर उठणारे पुरळ याकडे दुर्लक्ष न करणे फायदेशीर ठरणारे आहे.
असे केले जाते निदान
शरीरात विषाणूची लागण झाल्यानंतर आठ- दहा दिवसांत लक्षणे दिसतात.
तोंडात गालाच्या अंतर्गत भागात मोहरीप्रमाणे लालसर ठिपके दिसू लागतात. सर्दी, खोकल्यानंतर ताप वाढतो.
आजाराची तीव्रता असेल तर अंगावर पुरळ दिसतात. काही खाता येत नाही, भूकही मंदावते.
१०० गोवर-रुबेलाचे टक्के लसीकरण
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने गोवर आजाराची तीव्रता पाहता लसीकरण वेळेवर करण्यावर भर दिला जात आहे.
पालकांमध्ये जनजागृती करून हे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर दिला जातो.
जिल्ह्यात गोवरचे रुग्ण कमी प्रमाणात आढळतात. त्याचे कारण लसीकरण हेच दिसून येते.
...तर डॉक्टरांना दाखवा
ताप, सर्दी, खोकला आणि अंगावर पुरळ येणे ही गोवर आजाराची लक्षणे आहेत.
गोवर झाल्यानंतर भूक मंदावते, संपूर्ण अंगावर पुरळ होणे आणि ताप कमी न झाल्यास धोका वाढू शकतो. त्यामुळे लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे.
लसीकरणावर भर
गोवर आजाराला अटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेळेवर लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. लसीकरणाबाबत पालकांमध्येही जनजागृती करण्यात आली आहे. असे असले तरी आजाराची लक्षणे दिसली तर वेळेत उपचार घ्यावेत.
- डॉ. विवेक खतगावकर