जालना : हातभट्टी दारूविक्रीसह विविध प्रकारचे २८ गुन्हे दाखल असलेला आरोपी ऋषी भगवान जाधव याला कदीम पोलिसांनी स्थानबद्ध केले. दाखल प्रस्तावास जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऋषी भगवान जाधव याच्याविरुद्ध हातभट्टी दारू विक्रीसह चोरी, आर्मअॅक्ट, प्राणघातक हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वेळोवेळी कारवाई करून त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने कदीम पोलिसांनी एमपीडीए (कलम ३ पोटकलम (१) महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर कदीम पोलिसांनी ऋषी जाधव याला औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. सुभष भुजंग, कदीम पोलीस ठाण्याचे पोनि. प्रशांत महाजन यांच्यासह फौजदार गणेश सोळंके, हरीश राठोड, सुधाकर नागरे, कैलास जावळे, संतोष अंभोरे, रमेश राठोड, शुभदा पाईकराव, सायरा शेख, कैलास चेके यांच्या पथकाने केली.