फोटो
बदनापूर : तालुक्यातील कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावे, याकरिता बदनापूर येथे लवकरच डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू होणार आहे. बुधवारी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयाची माजी आमदार संतोष सांबरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी पाहणी केली.
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू व्हावे, यासाठी पंधरा दिवसापूर्वी माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. यात ते म्हणाले की, बदनापूर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. येथे मोठी बाजारपेठ असून, या परिसरातून जालना -औरंगाबाद महामार्ग गेलेला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात डीसीएचसी सेंटरची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथे डीसीएचसी सेंटर असणे गरजेचे आहे. या सेंटरमध्ये रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू बेड, रेमडेसिविर इंजेक्शनसह मोफत औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. याची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांना बुधवारी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली आहे. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत वाडीकर, तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा समन्वयक भरत सांबरे, जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण, अंकुश शिंदे, नंदकिशोर दाभाडे, वैजनाथ शिरसाट, श्रीराम कान्हेरे, संतोष नागवे, कैलास खैरे, बाबासाहेब शिंगारे आदींची उपस्थिती होती.