भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील गणेश दामोदर लोखंडे या भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात आरोपी असलेल्या या भोंदूबाबाने धामणगाव येथील एका घरात असलेले गुप्तधन बाहेर काढण्यासाठी ज्ञानेश्वर आहेर यांच्या चिमुकलीचा बळी देण्याचा मानस केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
ज्ञानेश्वर भिका आहेर यांनी ३ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोखंडे यास धामणगाव येथून अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. धामणगाव येथील घरात असलेले गुप्तधन काढण्यासाठी मुलीचा बळी देण्याची तयारी लोखंडे याने केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावेही हस्तगत केले आहेत. हा प्रकार भोकरदनचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तपास अधिकारी राकेश नेटके, कर्मचारी शिवाजी जाधव, सुरेश ढोरमारे, जावेद शेख यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
तीन-चार वर्षांपासून होता संपर्कातधामणगाव येथे एका जुन्या घरात मोठे गुप्त धन आहे. ते धन काढण्यासाठी नरबळी द्यायचा, असे भोंदूबाबा गणेश दामोदर लोखंडे याने ठरवले. त्यासाठी त्याने २-३ वर्षांपासून त्याच्या संपर्कात असलेले त्याचे भक्त ज्ञानेश्वर भिका आहेर यांच्या पाच वर्षाच्या मुलीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने आहेर दाम्पत्याकडे तगादा सुरू केला होता. शिवाय भोंदूबाबाने एका वकिलामार्फत ज्ञानेश्वर आहेर यांना मानहानीची नोटीसही बजावली होती. त्यामुळे ज्ञानेश्वर आहेर हे कुटुंबीय मानसिक तणावात होते. त्यातूनच पुढे ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्याही केली.
तीन बाय तीनचा २० फूट खोल खड्डाभोंदूबाबाकडे अनेक भाविक येत होते व त्याचा तो गैरफायदा घेत होता. ज्ञानेश्वर आहेर व त्याची पत्नीसुध्दा त्यांच्याकडे जात होते. त्यामुळे त्यांची मुलगी ही पायाळू आहे, हे गणेश लोखंडे याला माहिती होते. त्यामुळे त्याने धामणगाव येथे एक जीर्ण असलेले घर २ लाख रुपयात विकत घेतले. त्या ठिकाणी गुप्तधन आहे ते काढण्यासाठी त्याने दीड वर्षात ३ बाय ३ चा २० फूट खोल खड्डा खोदला होता. हा बाबा भांडखोर असल्याने त्याच्याशी गावातील नागरिक संपर्कात नव्हते. त्याचा विवाह झालेला असून २० वर्षे वयाचा त्याला एक मुलगासुध्दा आहे. तो नेहमी मुलगी द्यावी, यासाठी ज्ञानेश्वर आहेर यास मानसिक त्रास देत असल्याने आहेर यांनी आत्महत्या केली होती हे तपासात उघड झाले आहे. आरोपीकडून एक ब्रेकर मशीन व एक पुस्तक जप्त केल्याचे पोनि. किरण बिडवे यांनी सांगितले.
कारागृहात रवानगीभोंदूबाबाची १० मार्च रोजी पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्याविरुद्ध नरबळी देण्याच्या प्रयत्न करण्याचासुध्दा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी दिली.