लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने स्वीट मार्ट, तेल उत्पादकांसह इतर आस्थापनांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. १५ आस्थापनांमधील अन्नपदार्थांचे विविध नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शिवाय उत्पादकांना अन्नपदार्थ सुरक्षेबाबत आवश्यक त्या सूचनाही केल्या जात आहेत.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फराळानिमित्त लागणाऱ्या विविध अन्नपदार्थांच्या खरेदीवर नागरिकांचा मोठा भर असतो. अशा स्थितीत निकृष्ट दर्जाचे, खराब अन्नपदार्थ विक्री होऊ नयेत, त्याचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातील दुकानांची तपासणी सुरू केली आहे. आजवर केलेल्या तपासणीतून १५ ठिकाणच्या दुकानांमधील संशयित १५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.प्रयोगशाळेतून येणा-या अहवालानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया अन्न व औषध प्रशासनाकडून राबविली जाणार आहे.अन्नपदार्थ उत्पादित होणा-या दुकान, कंपनीतील आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, परिसर स्वच्छता, अन्नपदार्थ ठेवण्याची जागा यासह इतर बाबींची तपासणी केली जाते. काही दोष असतील तर संबंधितांना आवश्यक त्या सूचना जागीच केल्या जातात. शिवाय नियमानुसार कायदेशीर कारवाईचा बडगाही वेळोवेळी उगारला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.खाद्यपदार्थ तळण्यासाठी जे तेल वापरले जाते, त्याचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे. आस्थापना चालकांनाही याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तेलाचा सतत पुनर्वापर करून अन्नपदार्थ तळले जात असतील, तर ते शरीरासाठी धोकादायक असतात.
अन्न पदार्थांचे १५ नमुने औरंगाबाद प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:13 IST