लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील एका व्यापा-यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने चौघांना बुधवारी जेरबंद केले. या प्रकरणातील परतूर येथील मुख्य सूत्रधारासही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन वाहने, मोबाईलसह गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.जालना येथील व्यापारी विमलराज सिंघवी हे ३१ आॅक्टोबर रोजी पहाटे पत्नीसमवेत वन विभागाच्या जॉगिंग ट्रॅकवर सिंदखेड राजा मार्गाने जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी विमलराज सिंघवी यांच्यावर गोळीबार केला. यात सिंघवी हे गंभीर जखमी झाले होते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. व्यापारी सिंघवी यांच्यावर सोमीनाथ उर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड (रा. करोडी ता. जि. औरंगाबाद ह.मु.शिवनगर, जालना) याने त्याच्या साथीदारासह गोळीबार केल्याची माहिती स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती.या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहका-यांनी गुरूवारी गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हा गुन्हा दत्ता बाबासाहेब जाधव (रा.अंबा ता. परतूर), जालिंदर सर्जेराव सोलाट (रा. मांडवा ता.परतूर) या दोघांसह केल्याची कबुली गायकवाड याने दिली. गायकवाड याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर व्यापारी सिंघवी यांच्यावर केलेला गोळीबार हा राजेश मानकचंद नहार (रा. परतूर) याच्या सांगण्यावरून केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार राजेश नहार याला ताब्यात घेतले असून, सिंघवी यांच्यावर कोणत्या कारणाने प्राणघातक हल्ला घडवून आणला, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत संबंधितांकडून दोन वाहने, एक गावठी पिस्तूल, मोबाईल असा ८ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, पोना गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, हिरामन फलटणकर, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, पोकॉ सचिन चौधरी, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे, चालक पोकॉ सूरज साठे, पोना मंदा बनसोडे आदींनी केली. दरम्यान, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.गायकवाड विरुध्द अनेक गुन्हेव्यापा-यावर गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपी सोमीनाथ उर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड याच्याविरूध्द यापूर्वीही खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच व्यापारी सिंघवी यांच्यावर कोणत्या कारणाने गोळीबार करण्यात आला, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.संबंधित आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे गौर यांनी सांगितले.
व्यापाऱ्यावर गोळीबार करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:49 IST