जालना : घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई येथील दत्तात्रय गंदाखे यांच्या शेतततळ्यात अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने तब्बल ३३ हजार लहान मासे मरण पावले आहेत. यात शेतकऱ्याचे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दत्तात्रय गंदाखे यांची अंतरवाली दाई शिवारात आठ एकर शेती आहेत. शेतात त्यांनी शेततळे तयार केले आहे. ते शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करतात. यंदा चांगल्या पावसामुळे मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै महिन्यात त्यांनी शेततळ्यात ३३ हजार मत्स्यबीज सोडले होते. यातून साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते; परंतु गुरुवारी शेततळ्यात अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याने सर्वच मासे मरण पावले आहेत. यात त्यांचे जवळपास साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठ्यास कळविण्यात आले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा करून माहिती वरिष्ठांना पाठवितो, असे तलाठ्याने सांगितले. याबाबत मत्स्य विकास अधिकारी शंशीकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
जुलै महिन्यामध्ये ३३ हजार मत्स्यबीज शेततळ्यात सोडले होते. यातून जवळपास साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते; परंतु कोणीतरी शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने सर्वच मासे मरण पावले आहेत. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा.
-दत्तात्रय गंदाखे, शेतकरी