रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेकवेळा प्रयत्नही झाले पण अजूनही या प्रयत्नांना यश मिळालेले नाही. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशातील युद्ध संपवण्यासाठी एक प्रस्ताव देण्यात आला आहे. यासाठी रशियाच्या पुतिन यांच्यासमोर काही अटी ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बांगलादेशातील गोंधळ थांबेना! आधी शेख हसीना यांना बाहेर काढले, आता युनूस यांच्याविरोधात मोर्चा
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी व्लादिमीर पुतिन यांना रशियासोबतचे तीन वर्षांचे युद्ध संपवण्यासाठी सर्व युद्धकैद्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव दिला. रशियाने सर्व युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांना सोडले पाहिजे, असे झेलेन्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या तिसऱ्या वर्षानिमित्त कीव येथे झालेल्या शिखर परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे, त्या बदल्यात, युक्रेन सर्व रशियन युद्धकैद्यांना सोडण्यास तयार आहे. युद्ध संपवण्याची सुरुवात करण्याचा हा एक योग्य मार्ग असेल, असंही झेलेन्स्की म्हणाले.
ऑक्टोबर २०२४ मध्ये रशिया आणि युक्रेनने संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीखाली प्रत्येकी ९५ युद्धकैद्यांची सुटका केली. युक्रेनियन संसदेचे मानवाधिकार आयुक्त दिमिट्रो लुबिनेट्स म्हणाले की, २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही देशांनी कैद्यांची देवाणघेवाण करण्याची ही ५८ वी वेळ आहे. यापूर्वी, दोन्ही देशांनी सप्टेंबरमध्ये एकमेकांच्या १०३-१०३ कैद्यांना सोडले होते. दरम्यान, युद्धाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमणासमोर युक्रेनच्या प्रतिकाराची आणि शौर्याची प्रशंसा केली. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील युद्ध सुरूच आहे.
'...तर राष्ट्रपतीपद सोडण्यास तयार'
एक दिवस आधी, वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले होते की, जर त्यांच्या देशाला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर ते युक्रेनचे अध्यक्षपद तात्काळ सोडण्यास तयार आहेत. 'जर माझ्या या कृतीमुळे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होत असेल, जर तुम्हाला खरोखरच मी माझे पद सोडावे असे वाटत असेल, तर मी त्यासाठी तयार आहे.' युक्रेनला नाटो सदस्यत्व मिळाल्यास मी राष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देण्यास तयार आहे, असंही झेलेन्स्की म्हणाले.