मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अमेरिकेने दिलेला रशियासोबतच्या ३० दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकार करण्यास आम्ही तयार आहोत, असे युक्रेनने अमेरिकेसोबत सौदी अरेबियात झालेल्या एकदिवसीय चर्चेनंतर सांगितले आहे. त्यामुळे आता शस्त्रसंधी लागू करून युद्धाला अर्धविराम देण्याबाबतचा निर्णय रशियाच्या भूमिकेवर अवलंबून असेल.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, मी रशियासमोर या संबंधीचा प्रस्ताव ठेवणार आहे. आता चेंडू रशियाच्या कोर्टात आहे. मात्र रशियाने याबाबत अद्याप कुठलीही भूमिका सार्वजनिकपणे जाहीर केलेली नाही. तर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, आता शस्त्रसंधीच्या सकारात्मक प्रस्तावासाठी रशियाला राजी करण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे.
मात्र काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार व्लादिमीर पुतीन हे अमेरिकेकडून देण्यात आलेला आणि युक्रेनने मान्य केलेला ३० दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही वाटाघाटींमध्ये रशियाची युद्धाच्या मैदानात झालेली प्रगती आणि रशियाच्या चिंतांबाबत विचार झाला पाहिजे, अशी रशियाची भूमिका आहे. आता रशियाचे अधिकारी पुढच्या काही दिवसांत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मात्र अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावातील अटी मान्य केल्या जातील की नाही, याबाबत त्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.